Saturday, May 25, 2013

सुटकेची पॉवर?

सुटकेची पॉवर?
    साहेब बहादूरांना सक्काळी सक्काळीच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्याबद्दल रावसाहेबांनी भरचौकात पकडलं.आपल्याला पकडल्याचं दु: वाटण्याऐवजी कर्तव्यदक्ष रावसाहेबांचे, भारीच कौतुक साहेब बहादुरांना वाटले.ते त्यांच्या घोड्यावरुन खाली उतरले,आणि रावसाहेबांची पाठ थोपटली.आपले कर्तव्य अत्यंत कर्मठपणे आणि डोळयात तेल घालून बजावत असल्याबद्दल त्याचं अभिनंदनही केलं.
    शहाण्या,अभिनंदन बिभिनंदन कसला करतोस रे,तू भोकणा आहेस का? रावसाहेब,साहेबरावांवर खेकसले.रावसाहेबांना फालतू बाबींमध्ये रस नसल्याचं रावबहादुरांच्या लक्षात आलं.आता कामापुरतच बोलायचं असं मनी ठरवून त्यांनी रावसाहेबाच्या प्रश्नाचं उत्तर,नाही असं दिलं ..
    तू भोकणा नाहीस तर मग तुला लाल बत्ती दिसली कशी नाही..
    नाही दिसली रावसाहेब म्हणूनच मी रस्ता ओलांडत होतो ना..
    अशी कशी दिसली नाही,बनवतोस काय मला..
    रावसाहेब ,मी कशाला तुम्हाला बनवू.खरं तेच सांगितलं.
    काय खरं सांगितलं रे तू..
    हेच की मला लाल-बत्ती दिसली नाही.
    कां दिसली नाही..
    मी कोणत्यातरी विचारात असेन राव साहेब,आता मला आठवत नाही..
    आठवत नाही म्हणजे काय..
    नाही आठवत त्याला मी काय करणार..
    तुम्ही नाही करणार,तर औरंगजेब करणार काय?
    इथं औरंगजेबाचा काय संबंध..
    ,टरटर करु नकोस..मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे..मला प्रश्न विचारलेलं चालत नाही..
    चूक झाली रावसाहेब क्षमा असावी..
    अशी कशी चूक झाली..
    झाली,मी माझा गुन्हा कबूल करतो..
    असा कसा गुन्हा कबूल करतोस..
    म्हणजे गुन्हा कबूल करणं हा गुन्हा आहे की काय रावसाहेब?
    अरे तुला मी सांगितलं ना की,मला प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून..
    मग मला जाऊ द्या सोडा माझाघोडा..
    असं कसं जावू देणार..दंड कोण भरणार?अफजलखान की शाहिस्तेखान.
    ते कशाला भरणार .. मी गुन्हा केलाय ना.
    जास्त शहाणपणा करु नकोस..
    अहो रावसाहेब, मग मी काय करु..मी तुमची क्षमा मागितली,चूक कबूल केली,गुन्हा कबूल केला,दंड भरायला तयार आहे हे सांगितलं,आता मी काय करायला पाहिजे हे सांगा ना..
    शहाण्या जास्त ज्ञान पाजळू नकोस.. लाल बत्ती सुरु असताना रस्ता ओलांडू नये असं तुझ्या मास्तरानं शिकवलं नाही का?
    नाही शिकवलं.
    तरी वाटलच होतं मला,एवढा शिकला सवरला दिसतो,पण वाहतुकीचे नियम ,माहीत कसे नाहीत यास..आडातच नाहीत तर पोहऱ्यात कुठून येणार..बरोबर नं.
    बरोबर रावसाहेब अगदी बरोबर..
    अरे तुला काही लाज वाटते की नाही..बरोबर म्हणायला..
    रावसाहेब,माझी चूक मी कबूल केलीय ना.
    आधी गुन्हा करायचा मग चूक कबूल करुन म्हणायचे, सत्यमेव जयते.तू गुन्हाच केला नसता तर तुझा नि माझा एवढा वेळ वाया गेला असता का..वेळ म्हणजे अमूल्य असं धन..टाइम इज मनी हेही तुला नाही शिकवलं का तुझ्या मास्तरानं..कोण होता रे तुझा मास्तर..
    आठवत नाही..
    आठवत नाही म्हणजे,टाइम इज मनी आठवत नाही म्हणजे काय..
    रावसाहेबांनी दोनदा टाइम इज मनीचे पुनुरुच्चार केले आणि साहेबबहादुरांची ट्यूब पेटली.टाइम इज मनी पेक्षा मनी इज पॉवरफूल हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रातलं वचन त्यांच्या डोक्यात विजेसारखं चमकून गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं..त्यांनी भर चौकात रावसाहेबांची गळाभेट घेतली..सुटकेचा पॉवरफूल मार्ग त्यांना गवसला होता..
    000


No comments:

Post a Comment