Sunday, September 15, 2013

शौचनीय सभा

शौचनीय सभा
    रावसाहेबांना कुणी नाही म्हंटलेलं कधी आवडायचं नाही. हे सगळयांना चांगल्याच ठाऊक झालं होतं. बॉस मंडळी त्यानांच कोणताही कार्यक्रम, सभा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवित. त्यात त्यांना अद्याप तरी अपयश आले नव्हते. विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांच्या वतिने बोलावलेल्या सभांना गर्दी झाली नाही  असे कधीच झाले नाही.
    अशा या रावसाहेबांची ही ख्याती लक्षात घेऊनच त्यांच्या संघटनेने त्यांना आपले सरचिटणीस बनवले. हेतू हाच की संघटनेची बैठक जेव्हा जेव्हा बोलावली जाईल तेव्हा तेव्हा त्याला गर्दी होईल. पूर्ण कोरम भरेल. सभागृह तुडुंब भरुन वाहू लागेल. प्रत्येक सभा यशस्वी होईल आणि संघटनेचाही दबदबा वाढेल. रावसाहेबांना तर हे डाव्या नाकपुडीतील पांढरा केस झरदिशी ओढून फेकून देण्याइतपत सोप्प सोप्प वाटलं.
    पहिली बैठक  बोलावण्याची सूचना अध्यक्षांनी त्यांना केली. रावसाहेब कामाला लागले. सभेचा दिवस उगवला. सभेची वेळ आली. मात्र पहिल्यांदाच विपरित घडत होते .सभेची नियोजित वेळ होऊनही पाचही सदस्य आले नव्हते.
रावसाहेबांच्या संघटन कौशल्याचा फुगा टचकन फुटला. जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर रावसाहेब उड्या मारत होता. आयजीच्या जीववार बायजी मजा करत होता. बेडूक उड्या मारुन मारुन किती मारणार. बेडकाला बैल झाल्याचे स्वप्न कोणे एके काळी पडले होते. पण स्वप्न ते स्वप्न .बैल बैलाच्या जागी राहिला. बेडूक त्याच्या चिखलाच फसला. असं काही बाही रावसाहेबांबाबत पब्लिक बोलू लागले. सिंहाचं कातडं पांघरलेलं गाढव होतो आपण,असं खुद्द रावसाहेबांनाही वाटलं. एकाच वेळी आपण सिंह, गाढव,बैल आणि बेडूक या चार प्राण्यांच्या रुपात लोकांना दिसू शकतो याचं त्यांना हसूही आलं. पण ते कच्च्या गुरुचे चेले नव्हते. सिंहांचं कातडं घातल्यावर  गाढवाला सिंह झाल्यासारखे वाटले होते. पण त्या गाढवाला कधीच सिंहाचा सहवास लाभला नव्हता. त्याने कायम सिंहाला दूरुनच बघितले होते. हे लोक कां विसरतात? मात्र आपले तसे नाहीना. आपण सिंहाच्या मांडिला मांडी लावून बसतो. सिंह त्याचं माईंड आपल्यासमोर खुल करतो. एवढा विश्वास आपण कमावलाय. हे सुध्दा कुठे ठाऊकाय लोकांना. तो गाढव इसापनीतीतला होता. हा गाढव प्रॅक्टिकलनीतीतला. आता बघाच म्हणावं, कोल्हेकुई करणाऱ्यांना. सिंहाचं कातडं ओढताही गाढव काय चमत्कार करतो ते.रावसाहेब स्वत:लाच म्हणाले.आणि पुन्हा उत्साहाने कामाला फसफसले.
    000
    एके दिवशी अधिकाऱ्यांकडे बैठकीची नोटीस आली. प्रत्येक कार्यालयात असणाऱ्या किंवा नसणाऱ्या शौचालयाचा आढवा या बैठकीत घेतला जाणार होता. सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती तातडीने पुरवायची होती .नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठरलेलाच.
    ही नोटीस जाता अधिकाऱ्यांनी धावत पळत जाऊन कार्यालयातील शौचालयाची तपासणी केली. काहींना हायसे वाटले. काहींना बायसे वाटले. काहींना रडावेसे वाटले. काहींना कसेसेच वाटले. तर काहींना हेच काय मम तपाला म्हणत तेथेच मरावेसेही वाटले. याचा अर्थ बहुतेक अधिकाऱ्यांना काहींना काहीना तरी वाटलेच होते. हे आपले वाटणे त्यांनी बाजूला ठेऊन शौचालय अहवाल तयार केला आणि बैठकीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने ते पंधरा मिनिटे आधीच सभागृहात हजर झाले.
    बैठकीची अधिकृत वेळ होताच रावसाहेब उठून उभे राहिले आणि त्यांनी थेट संघटनेच्या बैठकीचा अजेंडा समोर ठेवला. आणि शौचालय बैठक निमित्तमात्र असल्याचे स्पष्ट केले. रावसाहेबांनी उल्लू बनवल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. रावसाहेबांच्या चेहऱ्यावर मी ,सिहांचं कातडं पांघरेला गाढव नसून रावसाहेबच आहे. सिंह नसलो तरी सिंहासारखाच..असे भाव उमटले. अनेक अधिकाऱ्यांनी हे भाव ओळखून त्यांनी रावसाहेबांना सॅल्यूट ठोकला तर काही अधिकाऱ्यांचे चेहरे तीन दिवस शौच झाल्यावर जसे होतात तसे झाल्याचे रावसाहेबांना दिसले..ते मनी खुष झाले आणि त्यांनी बैठक दणक्यात सुरु केली..


2



No comments:

Post a Comment