Sunday, September 29, 2013

झुरळांची दूर-दृष्टी

झुरळांची दूर-दृष्टी
      चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली नाही.आपल्या रुपयाचं मूल्य घसरत असल्यानं,कदाचित झुरळ पळण्याचं वृत्तमूल्य माध्यममार्तंडना कळलं नसावं.
      थोडी थोडकी नव्हे तर एक कोटी झुरळं पळ काढतात ती सुध्दा अभेद्य अशी ग्रेट वॉल ऑफ चायना असताना.ही एक कोटी झुरळं पळून पळून कुठे गेली असेल बरं. सरड्याची धाव कुंपनापर्यंत.पण,झुरळाची धाव कुठपर्यंत जाऊ शकतं,याचा काहीच आगापिछा नाही. या झुरळांना पळून जाण्याची प्रेरणा कशी मिळाली असेल, हासुध्दा एक प्रश्नच आहे. कारण त्याला आपण घरातील सिंकमधून कितीही  हाकलण्याचा  प्रयत्न  केला  तरी  ते पुन्हा तयारच असतात. हिटचा मारा दररोज करुनही ते त्यास दाद देत नाही. बळी पडतात. पुन्हा सकाळच्या रामप्रहारी वाकुल्या दाखवायला तयार.हे या झुरळांचं,मरते है शानसे आणि वाकुल्या दाखवते है शानसे  असं ऍ़टिट्यूड आहे.चिनमधल त्या एक कोटी झुरळांना हा ऍ़टिट्यूड नसावा का?
.याचा अर्थ त्यांनी फक्त शानसे मरावे असा नाही.मरावे परी कीर्तीरुपे उरावं,असाही आग्रह धरणं योग्य नव्हे.
      झुरळांच्या ऍ़टिट्यूडचा त्यांना ठाऊक नसलेला दुसरा गुणधर्म असा आहे की]ते पळ काढण्याऐवजी मनुष्यप्राण्यास पळता भूई थोडी करण्याची क्षमता ठेऊन आहेत.मनुष्यप्राणी जन्मास येण्याआधी झुरळाचं अवतार कार्य या पृथ्वीतलावर सुरु झालं होतं.कोट्यावधीवर्षांपूर्वीचा झुरळ आणि आजचा झुरळ यात कसलाही बदल झाला नाही. पृथ्वीतलावर आलेल्या अनंत युगांचा त्याने सक्षमपणे सामना केला आहे.पृथ्वीचा चेहरा बदलला. होत्याचं नव्हतं होण्यापर्यंत या बदलांनी वाटचाल झाली पण झुरळ मात्र जैसे थेच.
      या पृथ्वीतलावर तो मानवाला सिनियर आहे.त्याची त्याला जाणीव असल्यानेच तो मनुष्यप्राण्याच्या नाकावर टिच्चून सर्वत्र संचारी आहे.एक सुध्दा झुरळ माझ्या महाली सापडणार नाही असं ठामपणे मुकेश अंबाणी सांगू शकणार नाहीत.या विवेचनाचा अर्थ असाच की  पळून जाणं हा झुरळांच्या वृत्तीचा भाग नाही.
      त्यामुळे ते समुहाने पळून गेले.असं सांगणं हा त्यांच्या बदनामीचा कट तर नसावा ना!तसं जर असेल तर,हा कट कुणी केला असावा?त्यांचं मनोधैर्य कमी व्हावं हा तर कुटील डाव नसेल?असंख्य मोहिमा फत्ते केलेल्या चंगेजखानाच्या सैन्याचं मनोधैर्य खालवावं यासाठी खोटेनाटे प्रयत्न केले जाऊन,त्यास एका लढाईत प्रत्यक्ष भाग घेताही पराजयाचा सामना करावा लागला होता.झुरळांच्या बाबत हीच नीती तर अवलंबण्यात येत नाही ना!पण असं कां बरं व्हावं?
      एक कोटी झुरळांचं पळून जाणं हे छळछावणीतून पळून जाणाऱ्या सैनिकांसारखं नाही.झुरळांचा छळ होतो हे मान्य केले तरी या छळासाठी ते सदैव तप्तरच असतात हे सुध्दा खरच.ही वस्तुस्थिती लक्षात घेता झुरळांचं पळून जाणं ही दुर्लक्षणारी घटना नव्हे.
      आम्हास तर दुसराच संशय आहे की,सध्या मनुष्य प्राण्याचं मंगळावर आणि चंद्रावर वास्तव्य करण्याचं फार चाललय.मोठमोठी यान तयार होत आहेत.बुकिंग सुरु झाली आहेत.तिकडे वसाहती कशा-कधी -किती होतील याची गणित मांडली जात आहेत.सवर्त्रसंचारी झुरळांच्या मिशांना याची जाणीव तर झाली नसेल ना? समजा तसं असेल तर
झुरळांच्या पळून जाण्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे.ते पृथ्वीतलावर पहिल्यांदा अवतरले.हाच सन्मान त्यांना मंगळ वा चंद्रनिवासी होऊन प्राप्त करावयाचा तर नाही ना?

      मनुष्यप्राणी जेव्हा कधी मंगळ आणि चंद्रावर वास्तव्याला जाईल तेव्हा त्याच्या स्वागताला झुरळ अटेंशनमध्ये उभे राहतील.कदाचित हेच कारण असू शकतं या एक कोटी झुरळांचं पळून जाण्यामागचं.त्याला आपण पळून जाणं,कां म्हणतो.ते तर दूरदृष्टिने केलेलं स्थलांतरच असलं पाहिजे.(झुरळांचा विजय असो.)

No comments:

Post a Comment