Sunday, September 29, 2013

नियमानुसार काम की कामानुसार नियम?

नियमानुसार काम की कामानुसार नियम?
      रावसाहेब म्हणजे नियमांचा पक्का माणूस. सगळे नियम तोंडपाठ . त्यांनी नियम सांगणे सुरु केल्यावर भाऊसाहेबांची बोलती बंद झालीच पाहिले. बॉस-साहेबांचा तर प्रश्नच नसे.मला सांगू नका. काम कसे होईल ते बघा.एव्हढं साधं-स्वच्छ-सरळ असं त्यांचं सांगणं असे. पण नियमाशिवाय काम म्हणजे निविदेशिवाय रस्त्याची कामे किंवा तेलाशिवाय
भजी. अशी कामं केली तर कधीना कधी रोडरोलर अंगावरुन फिरणारच. भाऊसाहेबांना याची जाणीव असल्याने रावसाहेबांच्या काटेकोर  नियम(प्रेम)रुपी गुलाबाचे काटे रुतत असले तरी त्या काट्यांकडे ते दुर्लक्षच करायचे.त्यामुळे भाऊसाहेबांनी अमूक तमूक नियम दाखवा असं कधी रावसाहेबांना म्हंटलं नाही.
      असं सांगितलं जातं की,हजारो वर्षांपूर्वी वेद-उपनिषेदातील ऋचा तोंडपाठ करण्याचा परिपाठ होता. त्यामुळे ज्यांचं पाठातंर उत्तम त्यांच्या ऋचा अधिकृत.कुठे लिहिलीय ही ऋचा,असं कोणी कुणाला दरडावल्याचं एकाही  पाषाणावर पोरस-हुण-कुशानांनी कोरलं नाही की अशोकानेही कोरलं नाही.दस्तुरखुद्द औरंगजेबाला सुध्दा हे सुचलं नाही.
       रावसाहेबांचंही तसंच झालं होतं.एखाद्यानं नियम दाखवण्याचा आग्रह केला तर त्यांच्या अस्मितेल्या आधी बार्किंग आणि नंतर  बायटिंग डॉग्जचं रुप आलंच म्हणून समजायचं. गेलं ढोढ्यात, असं जोरात खेकसून,फाइल भिरकावून रावसाहेब तरातरा निघूनच जाणार.हे सगळ्यांना ठाऊक असल्यानं,रावसाहेबांनी कोणत्या पुस्तकातील नियमांचा आधार घेतला हे विचारण्याची हिम्मत करणं म्हणजे उंदरानं स्वत:हून मांजरापुढे जाऊन, गधे मुझे लाथ हाण, असं करण्यासारखं होतं.
      सगळयांना कळून चुकलं होतं की,फाइलवर नियमाची नोंद हवी.तो नियम कुठून आला,कसा आला ,कधी आला हे महत्वाचं नाही.किंवा अप्रस्तुतच आहे.(माहितीच्या अधिकारात पुढे-मागे कुणी विचारलच तर पुस्तक मिळत नाही किंवा शॉर्ट सर्किटमध्ये पुस्तक जळून गेलं,असं सांगण्याची सोय आहेच.) काम होण्यासाठी नियम हवा.काम झाले की फाइल बंद.त्या कामाला नियमाचं कवच लाभलं असल्यानं चिंतेचं कारण सांप्रतकालीन कुणी करण्याचं कारण नाही.भविष्यात कधीतरी ऑडिटरांना बंद फाइलमधील नियमांबद्दल शंका आलीच तर  ती शंका कू नसून सु असल्याचं मान्य केलं की काम फत्ते.शिवाय हा असा फाइलमध्ये नमूद नियम नाहीच्च,असं दाखवण्याची जबाबदारी ऑडिटरला घ्यावी लागेल. अशी जबाबदारी घ्यायची म्हणजे पुस्तक पाठ हवे किंवा सोबत हवे,किंवा ज्या ऑफिसात तो गेला असेल तिथे ते त्याक्षणी हवे.तिथे ते असल्यास त्या त्यापुस्तकात त्याविशिष्ट नियमांचे पृष्ठ असायला हवे.ते पृष्ठ जीर्णशिर्ण झाले असेल,फाटले असेल किंवा गहाळ झाले असेल तर,काय करणार?
      ऑफिसातले पुस्तक म्हणजे सार्वजनिक मालमत्ता.(एस टीच्या स्थानकातील स्वच्छतागृहासारखी.)नियमांचे पुस्तक ऐनवेळी दुकानात मिळायला ते काही पारले बिस्किट नव्हे.शिवाय दुकानात जुनी आवृती मिळाली तर कसे? नियम  नव्या आवृत्तीत असू शकतो ना! नवी आवृत्ती निघूच्च शकत नाही ,असा हेका ऑडिटर धरु शकत नाही.याचा अर्थ  ऑडिटरचाही रावसाहेब झाला नसल्यास,इकडे आड नि तिकडे विहीर.विहीर पाण्याने भरली असेल तर प्राण कंठाशी ,कोरडी ठणठणित असेल तर कपाळपमोक्ष आणि हातपायांच मोडणं ठरलेलच.तेव्हा रावसाहेबांनी फाइलमध्ये नमूद केलेल्या नियमांना आक्षेप घेण्याची हिम्मत ऑडिटरांना दाखवण्यासाठी  सिहांचं  काळीज लागलं असतं.ते कसं असतं ,हे कुणालाही ठाऊक नसल्याचं रावसाहेब आणि ऑडिटरही  चांगलेच ओळखून होते.(सिंहाला काळीजच नसतं अशी भाऊसाहेबांची खात्री होती.या खात्रीवर बॉस-साहेबांचा ठाम नसला तरी काळ-वेळ-सोईनुसार विश्वास होता.)
      समजा एखद्या ऑडिटरने नियम प्रकरण रेटून नेण्याचा बाणा दाखवलाच तर भाऊसाहेब ,त्या बाण्याचं समाधान,सुखानं करण्याची कला प्राप्त करुन होते.या कलेत रमणारा रसिक अद्याप तरी  भाऊसाहेबांना भेटलेला नाही.

000

No comments:

Post a Comment