Wednesday, October 2, 2013

झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला

झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला
       चीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का?
       असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर राजाला तितकीच थोर राणी आहे. राणीला नुकतच डोहाळे लागले आहेत. ती राणी असल्याने तिला कशाचेही डोहाळे लागू शकतात.सामान्यांच्या बायकांसारखे चिंचोके ते बोरचारं राणीला कसे चालणार? ते राणीपदाला शोभणार सुध्दा नाही. त्यामुळे राणीला डोहाळं लागले ते झुरळाच्या पिठल्याचं किंवा झुरळांच्या लोणच्यांचं किंवा झुरळाच्या भरिताचं किंवा झुरळ-बिर्याणीचं किंवा झुरळ-थेलपाचं किंवा झुरुळू रोटीचं.म्हणजे समथिंग खाद्यपदार्थ वुइथ फ्लेवर ऑफ झुरळ.
       थोर राजाला हे जेव्हा कळलं तेव्हा त्याला स्वाभाविकच थोर राणीसरकारांचा अभिमान वाटला. कारण त्याच्या राजघराण्यातील सत्तावीस पिढयांमधील राणीसरकारांना असे डोहाळे लागल्याची कोणतीही खबर त्यांच्या बखरीत नोंदवली नव्हती. थोर राजाला राणीसरकारांना कुठे ठेऊ नि कुठे नाही असे झाले. त्यांनी तत्काळ स्वत:ला राणीसरकारांसमोर पेश केले. राणीसरकारांनी लाडिकपणे डोहाळ इच्छा थेट राजांच्या डोळयात बघत व्यक्त केली. राणीसरकारांच्या दोन्ही हातांचे चुंबन घेऊन राजाने,त्यांना ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले.पुढचं झुरळांच पळून जाण्याचं रामायण एव्हाना आपणास चांगलेच ठाऊक झाले आहे.
        राणीसरकारांच्या डोहाळयांसाठी एखाददुसऱ्या झुरळाने कसे व्हायचे. त्यासाठी एक कोटीच झुरळं हवीत. ही एक कोटी झुरळं अनायसे होतीच.थोर राजाने ती बरोबर हेरुन पळवून नेली. या घटनेस झुरळ पळून गेल्याचे नाव दिलेही खरे तर मोठी काँन्स्पिरसी ठरते.असू द्या.आपलं काय जातं.
       थोर राजा,त्यांच्या राणीसरकार आणि झुरळ फ्लेवर डिश हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. पुढे खरोखरच असं झालं असेल का?हा थोर राजा मध्येच कसा उपटला? त्याने एक कोटी झुरळांना पळवण्याचा पराक्रम एकटयाने गाजवला की विश्वासू सैन्याच्या मदतीने त्याने हल्ला केला.याचा शोध घ्यायला हवा.
       असा शोध घेण्याची जबाबदारी हॉगवर्टस्थित मॅजिक स्कूलला देण्याचं सुचवायला हवं. याच हॉगवर्टमध्ये हॅरी पॉटर मॅजिक शिकायला गेला होता.आठवतय का? पावने दहा क्रमांकाच्या फलाटावरुन थेट ट्रेन जाते हॉगवर्टला. तिथे व्हॉल्डोमोरचा प्राण अजुनही घुटमळतोय आणि हॅरी पॉटर आणि त्याच्या मित्रांची मुलं जादू शिकताहेत. त्यांना एक कोटी झुरळांचं पळून जाणं किंवा थोर राजानं या झुरळांना पळवून नेणं यांचा अन्योन्न संबंध जोडणं योग्य की अयोग्य हे शोधून काढण्याचं असाइनमेन्ट द्यायला हवं.
        थोर राजा आणि राणी सरकारांच्या नावाने ही थिअरी पसरवून त्या एक कोटी झुरळांच्या पळून जाण्याचा प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्याचा कुणाचा डाव तर नसेल ना हा! अशा विविध थिअरी किंवा सिध्दांत सतत बाहेर पडून संशय गडद होण्याची शक्यता लक्षात घेता झुरळांमधील ज्येष्ठ भ्राताने समोर येऊन वस्तुस्थिती विदित करुन टाकावी.
       झुरळं कुठेही गेले नाहीत. हिमालयातील असंख्य तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाची मेरीगोल्ड यात्रा सुध्दा सुरु असू शकते त्यांची. हिमालय परिक्रमा करण्याचा त्यांनाही मोह होऊ शकतो.एव्हरेष्टवर त्यांच्या पूर्वजांच्या तिसऱ्या पिढीच्या स्मारकाला सुध्दा ते भेट देऊ शकतात. किंवा एखाद्या विपश्यना केंद्रात सुध्दा ध्यानधारणेसाठी ते जाऊ शकतात की. ध्यानाची गरज केवळ मानवाला आहे आणि झुरळाला नाही, हे काही कुणी अद्याप सांगितलेलं नाही. सांगितले असेल तरी त्यास काही पुरावा नाही. एक कोटी झुरळातील ज्येष्ठ भ्राताश्रींनी याविषयी सविस्तर विवेचन केले की संपलेच ना सारे...
झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला.(इती श्री झुरळपुराणे तृतीयाध्याय आणि अंतिम अध्याय समाप्त.)
0000


No comments:

Post a Comment