Sunday, October 6, 2013

महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..

महाराज सुध्दा बायकोस भ्यायचे..
सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली. तसे काही घडले नव्हते.सूर्य पूर्वेकडूनच उगवला होता.मग आज हे असे झाले कसे? रात्री महाराजांचे द्राक्षासव पेय प्राशन अतिरिक्त तर झाले नसावे ना?अशी शंका प्रधानजींना आली.पण ते नित्याचेच होते.त्यामुळे फार तर महाराज एक्स महाराणींच्या महालाकडून वाय महाराणींच्या महालाकडे धावले असते.प्रधानाकडे नव्हे.मग असे झाले कसे? पण आता विचार करण्यासाठी वेळ उरला नव्हता. महाराजांनी प्रधानजींना मुजरा करण्याची सुध्दा संधी देता चक्क मिठीच मारली. त्यांनी कसे बसे महाराजांच्या मिठीतून आपल्याला सोडवून घेतले आणि कुर्निसात घातला. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा ऍ़टमबॉब्मच फुटला होता.त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. महाराजांनी त्यांची ही अवस्था ओळखली आणि प्रधानजींना आसनावर बसवत महाराज म्हणाले.
प्रधानजी रिलॅक्स व्हा.मला तुमच्या घरी बघून असे बावचळून जावू नका.कधी कधी राजाने प्रजेच्या घरी जावे असे आमच्या पिताश्रींनी आम्ही पाच वर्षाचे असताना मार्गदर्शन केले होते.पण तशी संधी मिळत नव्हती. ती आज मिळाली. त्यामुळे आज आम्ही तुमच्याकडे धावत आलो.तुम्हाला वाटले ,सूर्य वायव्य दिशेकडून तर उगवला नाही ना. पण प्रधानजी घटनाच अशी घडली.आज आम्ही खूप खुष आहोत.त्यामुळे राहवून तुमच्याकडे धाव घ्यावीशी वाटली.
महारांजाचे बोलणे सुरु असताना प्रधानजींनी दीर्घ श्वास घेतला.आणि स्वत:चे बावचळलेपण मोठया कष्टाने दूर सारले आणि आणि विचारलं,महाराज एव्हढं घडलं तरी काय,सूर्य उत्तर दिशेला उगवण्यासारखं..म्हणजे ,महाराजांना आमच्याकडे धाव घेण्यासारखं..
प्रधानजी,आम्ही सारे काही सांगणारच आहोत.आज आमच्या मनावरचे दडपण एकदम संपून गेले आहे.
महाराजांवर काही दडपण असल्याचे आम्हास इतक्या वर्षात दिसले नाही.आटपाट नगराच्या राजावर दडपण याचा अर्थ आपल्या राज्यात सूर्य दक्षिणेकडून तर उगवत नव्हता ना..
प्रधानजी,तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेऊ नका.अहो,आटपाट नगराजा राजा असो नाही तर चक्रवर्ती सम्राट असो.काही अंदर की बातेचं दडपण त्याच्यावर असतं.ते केवळ त्यालाच ठाऊक असतं.तो कशाला त्याच्या प्रधानाला सांगेल.
मग महाराज,आज सूर्य पश्चिमेकडून तर उगवला नाही ना..
नाही प्रधानजी, सारखं आपलं सूर्य सूर्य करु नका.
मग,एव्हढे काय घडले असे की,आपली अंदर की बातचं दडपनच संपून गेलं..
प्रधानजी,आजपर्यंत आम्ही या दडपणाखाली होतो की केवळ  आम्हीच आणि आम्हीच आमच्या महाराणिंना भीत होतो.
मग आता काय झालं?
प्रधानजी,अहो श्रीयुत बराका ओबामा सर, सुध्दा त्यांच्या सौभाग्यतिंना भितात,असं त्यांनी स्वत:कबूल केलय.
म्हणजे ते चक्रवर्ती सम्राट,सर ओबामा..
होय तेच.ते भीतात..तर मग मी किस झाड की पत्ती.केवळ एका आटपाट नगराचा राजा.महाराणिंना आम्ही भितो याच दडपणाखाली आमचं निम्म आयुष्य गेलं.फक्त दाखवलं नाही .पण मनात मनात मात्र आम्ही बायल्या आहोत,असंच वाटत राहिलं.फार स्ट्रेस होता हो प्रधानजी याचा.पण चक्रवर्ती सम्राटांनी एका क्षणात आमच्या डोक्यावरचा ताण दूर केला.
खरय महाराज. प्रधानजीसुध्दा आता पूर्णपणे खुलून म्हणाले.
होय ना.प्रधानजी,बघा म्हणजे आम्ही आमच्या राणिंची भीती घेऊन इतकी वर्षं उत्तम राज्यकारभार केला की नाही.
होय महाराज ...
मग तुम्ही आम्हाला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवायला हवे की नको..
होय महाराज.प्रधानजी नम्रपणे म्हणाले. खूष होऊन महाराजांनी आपल्या महालाकडे प्रस्थान केले.
सूर्य जरी पूर्वेलाच उगवला होता तरी प्रधानजींना मात्र ती दिशा इशान्य वाटू वागली..
000


No comments:

Post a Comment