Sunday, October 27, 2013

टूर अंबाणी दादांच्या महालाची

टूर अंबाणी दादांच्या महालाची
    अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार  आणि  मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात. व्हाइट हाऊसच्या दर्शनाला सुश्री मल्लीका शेरावत जाऊ शकतात याचा अर्थ आपण-तुपणसुध्दा कधी ना कधी जाऊ शकतोच की !
    पण, ज्येष्ठ अंबाणी दादांच्या राजवाड्याचं तसं नाही. हा राजवाडा बघण्याची भूक केवळ इंग्रजी पेप्रातील वर्णनावरुनच भागवता येते. बिल क्लिंटन एकदा भारतात आल्यावर म्हणाले होते की ताजमहल नही देखा तो क्या खाक देखा? (आम्ही दररोज धारावी बघतो त्याचे काय? ते कोणत्याही खाक पेक्षा अधिकच की..असो.बिल भाऊंना ते कळायच नाही. त्यांना मोनिका लेंविस्की कळली नाही तर धारावी कुठून कळणार?) असो. तर बिल भौंच्या मुद्दयालाच धरुन असं म्हणावासं वाटतं की अंबाणी दादा आणि वहिनी यांचा महाल नही देखा तो क्या खाक देखा,असं राजपूत्र विल्यम आणि राजकुमारी पिप्पा मिडलटोन असं कधीतरी म्हणून, आपल्या जखमेवर मिठ चोळण्याआधी आपणास या महालाचे दर्शन घडले तर  किती बहार येईल. मात्र ही सफर कशी घडणार?
    आपण राष्ट्रपती भवनात जाऊ शकू,संसदेत जाऊ शकू,राजभवनात जाऊ शकू. इकडच्या तिकडच्या ओळखींनी हे शक्य आहे. पण अंबाणी दादांच्या महालाचे तसे नाही. त्यांच्याशी ओळखी असणारा आपला कुणीच (वाली-सुग्रिव) नाही. त्यांचा चिंरजीवांच्या वर्गात आपली कन्या किंवा कुमार नव्हते. त्यामुळे अंबाणी दादांच्या महाल दर्शनासाठी उपयुक्त ठरु शकतील असे हे मार्ग आपल्यासाठी नाहीत. इथेच एक मोठी संधी सचीन प्राजींसाठी हात जोडून उभी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.
    ज्येष्ठ अंबाणी दादा आणि वहिनी हे दोघेही सचीन प्राजींच्या प्रेमात असल्याचं साऱ्या जगाला ठाऊक झालय. सचीन प्राजींच्या निमित्त ते बॉम्बेच्या सर्व सुपर-ड्युपर महाजनांसाठी आपल्या राजवाडा किंवा महालात संधी मिळेल तेव्हा जंगी पार्टी देत असल्याचेही आता जगाला ठाऊक झाले आहे. त्यामुळे सचीन प्राजी यांनी जर अंबाणी महालाची टुर किंवा सफर--अंबाणीज अँटेलिआ पॅलेस अशा एखाद्या टीव्ही मालिकेच्या निर्मितीचा घाट घातलाच तर अंबाणी दादा आणि वहिनी नाही म्हणतील असं तुम्हाला वाटतं काय? सचीन प्राजी हे जरी चाळीशीच्या उंबरठ्यावर असले तरी ते मनाने एखाद्या बालकासारखेच आहेत. अंबाणी वहिनी या एका शाळेच्या चेअरमन असल्याने बालकांचं ह्रदय आणि मन फुलासारखं असतं ते जितकं जपाल तितकं छान,असं त्यांना नक्कीच ठाऊक असणार .त्यामुळेही त्या सचीन प्राजींना नकार देणार नाहीत.
    अशा टुर मालिका डिस्कव्हरी चॅनेल,फॉक्स हिस्ट्री वगैरे सारख्या चॅनेल्सवर सुपरहिट्ट होतात.शिवाय सचीन प्राजींच्या प्रेमात असणारे अमिताभ दद्दूजी हे गुजराथची टुर आपणास दररोज घडवत असतातच. सचीन प्राजींसठी ते त्यांचा अनुभव शेअर करणार नाहीत असं तुम्हास वाटतं काय? या मालिकेच्या शीर्षक गीत गायनासाठी सचीन प्राजींच्या प्रेमात असणाऱ्या लता दिदी किंवा आशाताई होकार देणार नाही असं तुम्हास वाटत काय ?
    अंबाणी दादांच्या महालाच्या टुर मालिकेच्या निर्मितीत सचीन प्राजी आहे असं कळताक्षणीच केसरी ,वीणा वर्ल्ड, कॉक्स ऍ़ण्ड किंग्ज, थॉमस कूक, कुओनी ट्रॅव्हल्स, या टुर कंपन्या रांगा लावतील. हक्काचा आणि घरचाच सहारा तर कुठे गेलाच नाही. सचीन प्राजी-अमिताभ दद्दू आणि लताताई या प्रिमिमय व्यक्ती या प्रिमिअम प्राडॅक्टशी संबंधित असल्याने तुम्हीच कां ही मालिका प्रायोजित करत नाही असे श्रीयुत रतन टाटा हे सांप्रतकालीन टाटा साम्राज्याचे प्रमुख श्रीयुत सायरस मिस्त्री यांना सांगू शकतील. सचीन प्राजींचं महत्व आणि माहात्म्य असं दंबंग नाही असं तुम्हास वाटत काय?
    (मोठी मालिका,मोठे प्रायोजक म्हणजे मोठी बिदागी.सचीन प्राजी तुम्ही आमच्या या सल्ल्याचा विचार कराच.शिवाय आम्ही फ्री-सल्लागार असल्याने ही कल्पना सुचविल्याबद्दल तुमच्याकडून रॉयल्टीसुध्दा घेणार नाही.सचीन प्राजी तुम्ही आम्हास इतकं दिलत तेव्हा आम्ही सुध्दा इल्लुसं तुम्हाला फ्री देऊ शकत नाही की काय?)


No comments:

Post a Comment