Sunday, September 29, 2013

स्साला एक झुरळ...

स्साला एक झुरळ...
      चीनमधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांची थिअरी क्रमांक एक आपण गेल्याच आठवड्यात बघितली. हा विषय घनगंभीर असल्यानं याची थिअरी क्रमांक दोन सुध्दा राहू शकते. प्रश्न संख्येचा आहे. एक कोटी ही  संख्या अबब करायला लावणारी अशीच.एक कोटीचे नाणे आपल्या समोर टाकले तर आपले फुफ्फुसच ऑफ व्हायचे. कौन बनेगा करोडपती जेव्हा सुरु झालं तेव्हा ते एक कोटीचं होतं.तो आकडा कानावर पडताच भारताच्या ऐंशी कोटी नागरिकांच्या पोटात धस्स झालं होतं.तेव्हा या कोटीच्या आकड्याची महती अशी असल्याने एक कोटी झुरळ पळून जातात तेव्हा त्याची थिअरी एकच कशी काय राहू शकेल?
000
      थिअरी क्रंमाक दोन अशी राहू शकते की,हे एक कोटी
झुरळ प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते. म्हणजे त्यांचं अस्तित्व हे कागदोपत्रीच असावं. कागदावर जशा विहिरी राहू शकतात, किंवा रोजगार हमी योजनेच्या कामावर बिल क्लिंटनही हजेरी लावू शकतात. तशी शक्यता नाकारता येत नाही. हिंदी-चिनी कधी काळी भाईभाई असल्याने एकमेकांना एकमेकांचा वाण नाही तर गुण तर लागू शकतो.तेव्हा कागदावरच असलेल्या या एक कोटी झुरळांना प्रत्यक्ष बघण्याचे फर्मान तिकडच्या भाऊसाहेबांनी तिकडच्या रावसाहेबांना दिल्यानंतर त्यांना हार्टअटॅक वगैरे काही आला नसावा. त्यांनी शांतपणे एस्स सर म्हणून झुरळ दाखवण्याची जय्यत तयारी सुरुही केली असावी. त्या तयारीचा भाग म्हणून ते प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यासाठी जेव्हा एक कोटी झुरळ ठेवलेल्या ठिकाणी गेले,तेव्हा तेथील दृष्य बघून त्यांना हायसेच वाटले असावे. कारण एक कोटी झुरळ जे कागदावरच होते ते आता प्रत्यक्षात नव्हते.(होत्याचे नव्हते यालाच म्हणतात.)
      रावसाहेबांपुढचा प्रश्नच मिटला ना! कारण झुरळं पळून गेले,हे सध्याचं वास्तव होतं.झुरळांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायात बेड्या अडकवलेल्या नव्हत्या. जे मुक्त असतात ते पळू शकतातच. या कथनावर भाऊसाहेब निरुत्तरच होणार होते. याची खात्री रावसाहेबांना असणार,त्यामुळे कागदावरचे झुरळ पळाले या घटनेने त्यांना हायसे वाटले.      हे गणित तसे समजायला सोपे नाही.त्यातली आकडे मोड अदृष्य अशी आहे. तरी प्रश्न असा उरतोच की कागदावर तरी एक कोटी झुरळ कां अस्तित्वात होते?
      जेव्हा अस्तिवात नसलेल्यांचे अस्तित्व गृहित धरले जाते,तेव्हा खरे तर क्रांतीची ठिगणीबिणगी पडते असे म्हणतात. जर हे सत्य असेल तर झुरळांच्या मनात क्रांतीची ठिणगी पडावी असा दुष्ट विचार कुणाच्या मनात तर आला नाही ना?झुरळं क्रांती करुन काय करणार? त्याला काही त्याचे स्वतंत्र राज्य थोडेच हवे. तो राज्य करण्यासाठी पात्रता अंगी बाणून आहे का? यावर कार्ल मार्क्सने विचारमंथन केल्याचे दिसत नाही.तोच नाही तर इतरांचा प्रश्नच उरत नाही.
      झुरळांनी क्रांतीप्रणव व्हावे असे दिवास्वप्न एखाद्या कविने बघण्याची शक्यता कमीच आहे. हा कवी रोमँटिक असेल तर नवीच भानगड व्हायची. कारण त्याला झुरळात जर त्याची प्रेयसी दिसली आणि त्याला कळले की एक कोटी जे झुरळ पळाले त्यात ही प्रेयसीही होती.म्हणजे कवीचा कडेलोट व्हायचा. पळून जाणारी प्रेयसी ज्या कविला असणार त्याचा पुरुषार्थ किती टिनपाट असणार? याचा अर्थ कुणाला तरी झुरळ-प्रेयसी आणि टिनपाट-पुरुषार्थ हा सिध्दांत तर रेटून न्यावयाचा नाही ना,या प्रतिमेतून.म्हणजेच कविचे नीतीधैर्य एकदा खचले की त्याची प्रतिभा बसली. बसलेल्या प्रतिभेचा कवी कसल्या डोंबल्याच्या प्रतिमा निर्माण करणार. उदात्त..मंगल किंवा क्रांतीप्रसव अशा.
      एक कोटी झुरळांच्या पळून जाण्याच्या घटनेच्या आगेमागे अशा अनेक दृष्य आणि अद्ष्य घटनांची मालिका गुंफलेली आहे. यातलं रहस्य हेच की झुरळं खरोखरच एक कोटी होते का? दोन कोटी कां नव्हते? किंवा मग एक लाख कां नव्हते? एक कोटीचा आकडा आला कसा? आणि रावसाहेबांनी हा एकच कोटी आकडा भाऊसाहेबांना कां सांगितला? रावसाहेबांची तर कुठे गफलत झाली नाही ना ? याचा अर्थ असणारे किंवा नसणारे झुरळ पळून गेले असतील तर रावसाहेब चांगलेच अडचणित येणार हे सत्य.ते अडचणित म्हणजे भाऊसाहेबही गोत्यातच की.स्साला एक झुरळ आदमी को पागल बना देता है ..नही क्या..


No comments:

Post a Comment